नवी दिल्ली : छुप्या मार्गाने दहशतवादी आणि त्यांच्यामार्फत शस्त्रास्त्रे अथवा अन्य सामुग्रीची भारतात तस्करी करण्यात अडचणी येत असल्यामुळे पाकिस्तानने आता तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. यामुळे गेल्या २०२३ या वर्षभरात सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील भारत-पाक सीमेवर एकूण १०७ पाकिस्तानी ड्रोन पाडले किंवा जप्त केले आहेत.
जम्मू, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील मिळून एकूण २२८९ किमी सीमा पाकिस्तानला लागून आहे. या सीमेचे संरक्षण सीमा सुरक्षा दल करते. यापैकी ५५३ किमी सीमा एकट्या पंजाब राज्यात आहे. या सीमेवर २०२३ साली सीमा सुरक्षा दलाने १०७ ड्रोनपैकी काही जप्त केले, तर काही पाडले. यापैकी बहुतांश ड्रोन चिनी बनावटीचे आहेत. पैकी दहा ड्रोन मानवरहित हवार्इ वाहन अर्थात यूएव्ही गटात मोडणारे होते. ते राजस्थान सीमेवर पकडण्यात आले आहेत. सीमा सुरक्षा दलाने ४४२.३९ किलो हेरॉईन पकडले असून ते ड्रोनच्या सहाय्याने भारतात पाठवण्यात आले होते. तसेच विविध कॅलिबरची २३ शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच ५०५ फैरी बंदुकीच्या गोळ्या देखील पंजाब सीमेवर जप्त केल्या आहेत. तसेच ३ पाकिस्तानी घुसखोर सीमा सुरक्षा दलाने मारले.