१०० वेळा ब्रेन स्ट्रोक आलेल्या रुग्णाला जीवदान

बंगळुरूतील डॉक्टरांच्या नावीन्यपू्र्ण तंत्राला यश
१०० वेळा ब्रेन स्ट्रोक आलेल्या रुग्णाला जीवदान
Published on

बंगळुरू : गेल्या एका महिन्यात साधारण १०० वेळा ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) आलेल्या रुग्णाला उपचारांचे नावीन्यपूर्ण तंत्र वापरून जीवदान देण्यात बंगळुरूतील डॉक्टरांना यश आले आहे. सततच्या आजारपणामुळे खुर्चीतही बसू न शकणारा हा ३४ वर्षीय तरुण आता स्वत: चालू लागला आहे.

केनगिरी येथील या रुग्णाला काहीसा विचित्र त्रास होत होता. त्याच्या मेंदूतील रक्तवाहिनीला सूज आल्याने मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नव्हता. त्याच्या उजव्या पायाला आणि खांद्याला मुंग्या येऊन तो भाग बधिर होत असे. यावेळी तो साधे खुर्चीवर बसूही शकत नसे. त्याला पाय काहीसे वर करून झोपवले असता थोडा आराम वाटत असे. यावेळी मेंदूला तात्पुरता रक्तपुरवठा होत होता, पण काही वेळाने पुन्हा त्रास होत असे. अनेक ठिकाणी एमआरआय चाचणी केल्यावर मेंदूवर विपरीत परिणाम होत चालल्याचे आढळून आले. त्याच्या या स्थितीला फोकल सेरेब्रल आर्टेरिओपॅथी (एफसीए) नावाचा विकार कारणीभूत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. या प्रकारात मेंदूचा रक्तपुरवठा जवळपास पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे या रुग्णाला वारंवार ब्रेन स्ट्रोकला सामोरे जावे लागत होते. त्याला वैद्यकीय परिभाषेत ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक्स (टीआयए) असे म्हणतात. दिवसातून तीन ते सहा वेळा रुग्णाला लहान-मोठे ब्रेन स्ट्रोक्स येऊन जात होते. एकदा तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची वाट पाहत असतानाच ब्रेन स्ट्रोक आला.

रुग्णाच्या या स्थितीवर इलाज करण्यासाठी डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे स्टेंट वापरून अँजिओप्लास्टी केली. मात्र, त्यानंतरही त्याला पूर्वीप्रमाणेच त्रास होत होता. तेव्हा डॉक्टरांनी थोडी नावीन्यपूर्ण प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या रक्तवाहिनीतील पोकळी कमी होऊन पुढील भागाला होणारा रक्तपुरवठा रोखला गेला तर तेथे लहानसा फुगा नेऊन रक्तवाहिनीचा आकार पूर्ववत केला जातो आणि रक्तवाहिनी पुन्हा आकुंचित पावू नये म्हणून त्या जागी धातूच्या स्प्रिंगप्रमाणे दिसणारा स्टेंट बसवला जातो. यावेळी डॉक्टरांनी त्यात थोडा बदल केला. रक्तवाहिनीत पाठवल्या जाणाऱ्या फुग्याला बाहेरून औषधाचे वेष्टन दिले. हा औषधलेपित फुगा (ड्रग-कोटेड बलून) रक्तवाहिनीत एक मिनिटभर तसाच ठेवला, जेणेकरून औषध त्या भागात शोषले जाईल. त्यानंतर तेथे स्टेंट बसवला गेला. ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक्स येणाऱ्या रुग्णावर औषधलेपित फुगा वापरून प्रथमच उपचार करण्यात आले असून, ते यशस्वीही झाल्याचे दिसून आले.

फोकल सेरेब्रल आर्टेरिओपॅथीचा (एफसीए) वाढता धोका

फोकल सेरेब्रल आर्टेरिओपॅथीचा (एफसीए) समाजात वाढता प्रसार होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढत आहे. सामान्यपणे या रोगावर स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसंट्स प्रकारची औषधे वापरली जातात, पण अद्याप त्यावर रामबाण उपाय सापडलेला नाही. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांच्यासह निद्रानाश आदी विकारांमुळेही स्ट्रोक्सच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in