
भुवनेश्वर : ओदिशातील कटकजवळील नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ एसी डबे रविवारी सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास रुळावरून घसरले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. वैद्यकीय आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी तत्काळ बचावकार्य राबवले.
कामाख्या एक्स्प्रेस रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे अनेक एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. धौली एक्स्प्रेस, नीलांचल एक्स्प्रेस, पुरुलिया एक्स्प्रेस यांचे मार्ग बदलले आहेत. कामाख्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
बंगळुरू-कामाख्या एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२५५१) बंगळुरूहून गुवाहाटीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त रिलीफ ट्रेन तसेच मेडिकल रिलीफ ट्रेनही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी सांगितले की, “आम्हाला कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली. एका प्रवाशाचा मृत्यू वगळता, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
अपघात निवारण गाड्या, आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे पाठवण्यात आली आहेत. याबरोबरच जीएम/ईसीओआर आणि इतर उच्चस्तरीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या अपघाताचे कारण चौकशीनंतर समोर येईल. त्या मार्गावर थांबलेल्या गाड्या वळवणे आणि पूर्ववत काम सुरू करणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे.”