तेहरान : इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील रास्क शहरात गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात ११ जण ठार असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सिस्तान-बलुचिस्तान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर अली रजा मर्हेमाती यांनी सांगितले की, तेहरानच्या नैऋत्येस सुमारे १४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रास्क शहरात पहाटे २ वाजता झालेल्या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सैनिक मारले गेले. पोलिसांनी गोळीबारात अनेक हल्लेखोरांना ठार केले.
सरकारी टीव्ही चॅनेलने या हल्ल्याचा आरोप जैश अल-अदल या फुटीरतावादी गटावर केला आहे. जैश अल-अदलने २०१९ साली बसवर केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड दलाचे २७ सदस्य ठार झाले. अलीकडच्या काही महिन्यांत सुन्नीबहुल प्रदेशातील अतिरेकी आणि लहान फुटीरतावादी गटांनी सरकारच्या विरोधात बंडखोरीचा भाग म्हणून पोलीस ठाण्यांवर हल्ले केले आहेत.