गुजरातमध्ये ४ कोटी ९२ लाख मतदारांत ११ लाख ३२ हजार नवमतदार; वयाची शंभरी ओलांडलेले १०,३२२ मतदार

लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील २६ जागांसाठी ४ कोटी ९२ लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्जा झाले आहेत.
गुजरातमध्ये ४ कोटी ९२ लाख मतदारांत ११ लाख ३२ हजार नवमतदार; वयाची शंभरी ओलांडलेले १०,३२२ मतदार

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील २६ जागांसाठी ४ कोटी ९२ लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्जा झाले आहेत. यामध्ये ११ लाख ३२ हजार मतदार यावेळी प्रथमच मतदान करणार असून १० हजार ३२२ मतदार हे वयाची १०० पूर्ण केलेले आहेत हे विशेष.

गुजरातमध्ये ७ मे रोजी २६ लोकसभा मतदारसंघ आणि पाच विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी भरण्याची प्रक्रिया सुरू होईल असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले.

एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी २.५४ कोटी पुरुष आणि २.३९ कोटी महिला आहेत. राज्यामध्ये १,५०३ ट्रान्सजेंडर मतदार आहेत, अशीही माहिती भारती यांनी दिली.

२०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत गुजरातमधील लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ४३,२३,७८९ ने वाढली आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार एकूण ४,९४,४९,४६९ मतदारांची नोंदणी झाली आहे, असे भारती यांनी सांगितले.

भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये लोकसभा निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे तयार आहे आणि मतदार याद्या, ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि मतदान केंद्रांच्या संदर्भात विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे, मतदान केंद्रांवर निर्विघ्न आणि आनंददायी मतदानाचा अनुभव मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी ८७०४२ बॅलेट युनिट्स, ७१६८२ ईव्हीएमचे नियंत्रण युनिट व व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल मशिन्स एकंदर २९५६८ इतक्या मतदान केंद्रांवर वापरल्या जातील. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज केलेल्या १६.५ लाखांहून अधिक व्यक्तींना मतदार कार्ड देण्याची प्रक्रिया वेगाने केली जात आहे, असे भारती यांनी सांगितले.

राज्यातील १८२ विधानसभा जागांपैकी प्रत्येक ठिकाणी एक ‘मॉडेल मतदान केंद्र’ असेल, जे सेल्फी बूथने या प्रसंगी सुशोभित केले जातील. या बूथमध्ये पार्किंग आणि बसण्याची सुविधा असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in