जूनमध्ये पावसाची ११ टक्के तूट, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार; भारतीय हवामान खात्याची माहिती

२००१ नंतर सातव्यांदा जून महिन्यात कमी पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
जूनमध्ये पावसाची ११ टक्के तूट, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार; भारतीय हवामान खात्याची माहिती

नवी दिल्ली : यंदाच्या जूनमध्ये पावसाचा ११ टक्के तुटवडा झाला आहे. दरवर्षी जूनमध्ये सरासरी १६५.३ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा केवळ १४७.२ मिमी पाऊस झाला. २००१ नंतर सातव्यांदा जून महिन्यात कमी पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली, तर जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. हवामान खात्याने सांगितले की, महाराष्ट्रापर्यंत मान्सून चांगला पोहचला. मात्र नंतर तो पुढे जाण्यासाठी योग्य परिस्थिती बनली नाही. पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पुरेसा पाऊस पडलाच नाही.

१०६ मिमी पाऊस होणार

वायव्य भारत सोडून सर्व ठिकाणी जुलैमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मोहपात्रा यांनी सांगितले की, जुलैमध्ये सरासरी १०६ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य, वायव्य भारतातील काही भाग, पूर्व, दक्षिण पूर्वेकडील काही भाग सोडून सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

दक्षिण भारतात १४ टक्के अतिरिक्त पर्जन्यमान

हवामान खात्याचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, उत्तर पश्चिम भारतात ३३ टक्के पाऊस, मध्य भारतात १४ टक्के, पूर्व भारतात १३ टक्के पाऊस कमी झाला, तर दक्षिण भारतात १४ टक्के अतिरिक्त पाऊस झाला. यंदा ३० मे रोजी केरळ व पूर्व भारतात मान्सूनचे आगमन झाले होते. त्यामुळे चांगला पाऊस होईल असे वाटत होते, पण जूनअखेर पावसाने ११ टक्के तूट नोंदवली. ११ ते २७ जूनपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

logo
marathi.freepressjournal.in