राम मंदिरासाठी ११०० कोटी खर्च; श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती

गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या गर्भगृहात ५१ इंच रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली. प्रभू रामचंद्राच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.
राम मंदिरासाठी ११०० कोटी खर्च; श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती

अयोध्या : अयोध्येत रामाचे भव्य मंदिराचे काम सुरू आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला होणार आहे. या मंदिरासाठी आतापर्यंत ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली.

ते म्हणाले की, मंदिरातील जुनी रामलल्लाची मूर्ती ही नवीन मूर्तीच्या समोर ठेवली जाईल. २२ जानेवारी मंदिरात ही मूर्ती प्रतिष्ठित केली जाईल. या मंदिराचे काम पूर्ण व्हायला अजून ३०० कोटी रुपयांची आवश्यकता असेल.

गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या गर्भगृहात ५१ इंच रामलल्लाची मूर्ती ठेवण्यात आली. प्रभू रामचंद्राच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. त्यात म्हैसूर येथील मूर्तिकार अरुण योगीराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी निवडली गेली. अन्य दोन मूर्तींचे काय करणार यावर गिरी म्हणाले की, आम्ही पूर्ण आदराने व सन्मानाने मंदिरात या मूर्ती ठेवू. एक मूर्ती आमच्याकडे ठेवली जाईल. कारण प्रभू श्रीरामचंद्राचे वस्त्र व दागिन्यांचे माप घ्यायला आम्हाला त्याची आवश्यकता लागेल. जुनी मूर्ती केवळ पाच ते सहा इंचाची आहे. ती २५ ते ३० फूट उंचीवरून ती पाहायली जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला मोठ्या मूर्तीची आवश्यकता होती, असे ते म्हणाले.

मंदिराचे एक मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. आम्ही आणखी एक मजला बनवत आहोत. अरुण योगीराज यांच्या मूर्ती निवडीचे समर्थन करताना ते म्हणाले की, तीनपैकी एका मूर्तीची निवड करणे कठीण होते. आम्ही दिलेले सर्व निकष या मूर्तिकारांनी पूर्ण केले. या मूर्ती बनवायला चार ते पाच महिने लागले. मूर्तीचे काम पूर्ण झाल्यावर सर्व मूर्तींना आम्ही पाहिले व निर्णय घेतला. ५०० वर्षांनंतर भारतात विशेष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. आम्ही हा कार्यक्रम दिवाळी समजत आहोत.

logo
marathi.freepressjournal.in