नोएडामध्ये फ्लॅट बुक करणाऱ्यांची फसवणुक, वेगवेगळ्या बिल्डर्सकडे १.१८ लाख कोटी अडकले

अॅनारॉकने आपल्या संशोधनात २०१४ आणि त्यापूर्वी सुरू केलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचाच समावेश केला
 नोएडामध्ये फ्लॅट बुक करणाऱ्यांची फसवणुक, वेगवेगळ्या बिल्डर्सकडे १.१८ लाख कोटी अडकले

एनसीआरमध्ये राहण्याचे स्वप्न पाहून नोएडा आणि ग्रेटर नोएडा भागात फ्लॅट बुक करणाऱ्यांचे १.१८ लाख कोटी रुपये वेगवेगळ्या बिल्डर्सकडे सध्या अडकले आहेत. १.६५ लाख घरे लोकांनी बुक केली असून या घरांचे बांधकाम रखडले आहे, असे प्रॉपर्टी कन्सल्टंट अॅनारॉकने म्हटले आहे.

अॅनारॉकने आपल्या संशोधनात २०१४ आणि त्यापूर्वी सुरू केलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचाच समावेश केला आहे. हे प्रकल्प दिल्ली, एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथे सुरू करण्यात आले.

या घर खरेदीदारांची सर्वोच्च संस्था असलेल्या फोरम ऑफ पीपल्स कलेक्टिव्ह इफर्ट्स (एफपीसीई)चे प्रेसिडेंट अभय उपाध्याय यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाईची त्वरित चौकशी करून या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. थकबाकीदार बिल्डरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मालमत्ता सल्लागार अॅनारॉकच्या संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, वर नमूद केलेल्या सात शहरांमधील ४,७९,९४० घरांसाठी बांधकाम व्यावसायिकांना लोकांनी दिलेले सुमारे ४,४८,१२९ कोटी रुपये अडकले आहेत. ही आकडेवारी ३१ मे २०२० पर्यंतची आहे.

या अहवालात म्हटले आहे की, यातील ५० टक्के घरे फक्त दिल्ली आणि एनसीआरमधील आहे. दिल्ली एनसीआर भागात रखडलेल्या २,४०,६१० घरांमध्ये १,८१,४१० कोटी रुपये अडकले आहेत. ॲनारॉकच्या डेटामध्ये, त्यातील ७० टक्के नोएडा आणि ग्रेटर नोएडा विभागातील आहेत. एकट्या नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये १,६५,३४८ रखडलेल्या घरांपैकी १,१८,५७८ कोटी रुपये अडकले आहेत. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये अशी केवळ १३ टक्के प्रकरणे आहेत आणि हे शहर या बाबतीत सर्वोत्तम स्थितीत आहे. गुरुग्राममध्ये ४४,४५५ कोटी रुपयांची गुंतवणूक रखडलोल्या ३०,७३३ घरांमध्ये अडकली आहे. तसेच गाझियाबाद शहरात त एकत्रितपणे २२,१२८ रखडलेल्या घरांमध्ये ९,२५४ कोटी रुपये अडकले आहेत. दिल्ली, फरिदाबाद, धरुहेरा आणि भिवडी भागातील रखडलेल्या घरांमध्ये ९,१२४ कोटी रुपये गुंतले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in