
नवी दिल्ली : युक्रेनविरोधात लढणाऱ्या रशियन सैन्यातील १२ भारतीयांचा मृत्यू झाला असून १६ जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र खात्याने दिली.
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, रशियातील भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशिया-युक्रेन संघर्षात मरण पावलेला बिनील बाबू याची घटना दुर्दैवी आहे. आम्ही त्याच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे. त्याचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांशी भारतीय वकिलात संपर्कात आहे, तर एका भारतीयावर मॉस्कोत उपचार सुरू आहेत. ते उपचारानंतर भारतात परततील, असे त्यांनी सांगितले.
रशियन लष्करात भारतातर्फे १२६ जण लढले आहेत. त्यातील ९६ जणांवर उपचार करून त्यांना मायदेशी पाठवण्यात आले. उर्वरित ३० पैकी १२ जणांचा मृत्यू झाला.