विमानाच्या गियर बॉक्समधून १३ वर्षांच्या मुलाचा प्रवास; कुतुहलापोटी केले धाडस

काबूलहून उड्डाण केलेल्या विमानाच्या लँडिंग गियर बॉक्समध्ये बसून १३ वर्षांचा एक अफगाणी मुलगा थेट दिल्लीत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुतुहलापोटी हा मुलगा विमानाच्या लँडिंग कम्पार्टमेंटमध्ये बसला होता, अशी माहिती त्याने दिली.
विमानाच्या गियर बॉक्समधून १३ वर्षांच्या मुलाचा प्रवास; कुतुहलापोटी केले धाडस
Photo : X
Published on

नवी दिल्ली : काबूलहून उड्डाण केलेल्या विमानाच्या लँडिंग गियर बॉक्समध्ये बसून १३ वर्षांचा एक अफगाणी मुलगा थेट दिल्लीत पोहोचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुतुहलापोटी हा मुलगा विमानाच्या लँडिंग कम्पार्टमेंटमध्ये बसला होता, अशी माहिती त्याने दिली.

केएएम एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी ११ वाजता २ तासांच्या प्रवासानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (आयजीआय) विमानतळावर पोहोचले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हे कळल्यानंतर हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनी चौकशीचे सोपस्कार करून त्या मुलाला त्याच विमानातून अफगाणिस्तानात परत पाठवले.

अफगाणिस्तानातील कुंदुज शहरात राहणाऱ्या या मुलाने सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून काबूल विमानतळावर प्रवेश केला होता. गंमत म्हणून त्याने विमानाच्या लँडिंग गियर बॉक्समध्ये प्रवेश केला. तो तिथून बाहेर पडण्याआधीच विमानाने उड्डाण केले. दिल्लीत विमान उतरल्यानंतर तो उतरला.

त्याला पाहून एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला माहिती दिली. खबरदारी म्हणून सुरक्षा अधिकाऱ्यांनी लँडिंग गियर डब्यात तपासणी केली. तेथे त्यांना लाल रंगाचा लहान स्पीकर आढळला. तो मुलाने सोबत आणला होता. त्यानंतर संपूर्ण विमानाचीही तपासणी करण्यात आली.

पोहोचला भारतात

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, हा मुलगा अफगाणिस्तानचा आहे. त्याला खरे तर इराणला जायचे होते, पण तो चुकून भारताकडे येणाऱ्या विमानाच्या चाकात लपला. त्याने पोलिसांना सांगितले की, तो प्रवाशांच्या गाडीच्या मागून विमानतळाच्या आतमध्ये घुसला आणि त्यानंतर विमानांच्या चाकांच्या जागेत लपून बसला.

असा वाचला जीव

एव्हिएशन तज्ज्ञांच्या मते, टेक-ऑफ करताना चाके विमानामध्ये ओढली जातात आणि त्यानंतर दरवाजा बंद होतो. हा मुलगा याच बंद जागेत लपून राहिला असावा. इथे हवा आणि तापमान जवळपास सामान्य राहिल्याने तो जिवंत राहू शकला.

logo
marathi.freepressjournal.in