१४ खासदार निलंबित ;सुरक्षा भेदल्याच्या प्रकरणावरून संसदेत प्रचंड गदारोळ

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली.
१४ खासदार निलंबित ;सुरक्षा भेदल्याच्या प्रकरणावरून संसदेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली : कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून संसदेत चार तरुण घुसल्याच्या प्रकरणाचे पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याबद्दल विरोधकांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने संसदेत प्रचंड गदारोळ माजला. विरोधी काँग्रेससह सर्वच पक्षांनी सरकारला धारेवर धरले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे दिवसभरात अनेकवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. गोंधळ घालून कामकाजात वारंवार अडथळा आणणाऱ्या विरोधी पक्षांच्या लोकसभेतील १४ आणि राज्यसभेतील एका खासदाराला अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.

अध्यक्ष ओम बिर्ला लोकसभेत पोहोचताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गदारोळ सुरू केला. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ओम बिर्ला यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. बुधवारी घडलेल्या घटनेबद्दल सर्वांनाच चिंता आहे, ही घटना दुर्दैवी असून त्यावर चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. लोकसभेचा अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, ‘‘या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. अध्यक्षांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. संसदेत प्रवेश करण्यासाठी आम्ही कोणाला पास देतो, याची काळजी घेतली पाहिजे. गोंधळाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा लोकांना पास देऊ नयेत, याची काळजी खासदारांना घ्यावी लागणार आहे. भविष्यात सर्व खबरदारी घेतली जाईल.’’

तरीही सभागृहात गोंधळ कायम राहिला. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांनी या प्रकाराचे राजकारण करू नये, असे आवाहन करत शांतता राखण्याचे आवाहन केले. तरीही गोंधळ न थांबल्याने अखेर लोकसभेतील काँग्रेसचे पाच खासदार टी. एन. प्रतापन, हिबी इडन, जोथिमनी, रमया हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतरही विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घालत निदर्शने सुरूच ठेवली. त्यामुळे आणखी नऊ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यात द्रमुकच्या कनिमोझी, बेनी बेहानन, व्ही. के. श्रीकंदन, मोहमंद जावेद, पी. आर. नटराजन, के. सुब्रह्मण्यम, एस. आर. पार्थीबन, एस. वेंकटेशन, मणिकम टागोर यांचा समावेश आहे.

लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ माजवला. खासदारांनी घोषणाबाजी करत संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन सभागृहाच्या वेलमध्ये आले. यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला. ते न पटल्याने सभापतींनी त्यांना तातडीने सभागृह सोडण्यास सांगितले आणि सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर निलंबित सदस्य डेरेक पुन्हा सभागृहात आले आणि कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटणार

इंडिया आघाडीचे नेते संसदेतील सुरक्षेतील त्रुटींबाबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्ष राष्ट्रपतींकडे भेटीची वेळ मागणार आहेत. या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांत विरोधी पक्ष अमित शहा यांच्याकडून निवेदनाची मागणी करणार आहेत.

काँग्रेसकडून केंद्राची कोंडी

संसदेच्या सुरक्षेबाबत काँग्रेसने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेत म्हणाले, ‘‘हा केवळ लोकसभा आणि राज्यसभेचा प्रश्न नाही. एवढा कडेकोट बंदोबस्त असतानाही दोन जणांनी आत येऊन सुरक्षेचा भंग कसा केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी ४ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in