छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा; १ कोटीचे बक्षीस असलेला जयराम रेड्डी उर्फ चलपतीही ठार

छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
१ कोटीचे बक्षीस असलेला जयराम रेड्डी उर्फ चलपतीही ठार
१ कोटीचे बक्षीस असलेला जयराम रेड्डी उर्फ चलपतीही ठार
Published on

रायपूर : छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जयराम रेड्डी ऊर्फ ​​चलपतीही ठार झाला आहे. हे ऑपरेशन म्हणजे सुरक्षा दलाला मिळालेले सर्वात मोठे यश असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

छत्तीसगड-ओदिशा सीमेवर असलेल्या कुल्हाडी घाटाच्या जंगलात रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या या चकमकीत चलपती याला ठार मारण्यात जवानांना यश आले. घटनास्थळावरून सर्व मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या भागात सध्या जवानांचे शोधकार्य सुरू आहे. या चकमकीत एक महिला नक्षलवादीही ठार झाली आहे. या कारवाईत कोब्रा बटालियनचा एक सैनिक जखमी झाला असून त्याला विमानाने रायपूरला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या कारवाईत छत्तीसगड आणि ओदिशा पोलिसांची १० पथके सामील झाली होती. त्यात जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दल, छत्तीसगडमधील कोब्रा बटालियन तसेच ओदिशातील विशेष ऑपरेशन समूहाचा समावेश होता.

नक्षलवाद शेवटची घटका मोजतोय - शहा

२०२६पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचे आश्वासन देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “ही कारवाई म्हणजे नक्षलवाद संपवण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आपल्या सुरक्षा दलाला मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. नक्षलवाद आता शेवटची घटका मोजत आहे.”

logo
marathi.freepressjournal.in