उज्जैनच्या महाकाळ मंदिराच्या गर्भगृहात आग; पुजाऱ्यासह १४ जण भाजले

उज्जैनच्या महाकाळ मंदिरात झालेल्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
उज्जैनच्या महाकाळ मंदिराच्या गर्भगृहात आग; पुजाऱ्यासह १४ जण भाजले

उज्जैन : उज्जैनच्या जगप्रसिद्ध महाकाळेश्वर मंदिरात सोमवारी भस्म आरतीच्या वेळी अघटित घटना घडली. मंदिराच्या गर्भगृहात लागलेल्या आगीत पुजाऱ्यासह १४ जण भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना १ लाख रुपयांची मदत व मोफत उपचारांची घोषणा केली. महाकाळ मंदिरात रोज सकाळी भस्म आरती होत असते. सोमवारी सकाळी ५.५० वाजता आरती सुरू होती. पूजेच्या थाळीत कापूर जाळला जात होता.

त्याचवेळी अचानक कोणीतरी पुजारी संजीव यांच्यावर गुलाल उधळल्याचे जखमी सेवकाने सांगितले. हा गुलाल दिव्यावर पडल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गर्भगृहातील चांदीच्या आवरणाला रंगापासून वाचवण्यासाठी फ्लॅक्स लावली जात असे. यामुळेही आग लागली. काही लोकांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र, या दुर्घटनेत १४ जण जखमी झाले. त्यातील काही जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून ८ जणांना उपचारांसाठी इंदूरला हलवले आहे.

न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश

या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ मृणाल मीना व अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुल जैन यांच्या अध्यक्षतेखाली न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चौकशीचा अहवाल तीन दिवसांत द्यायला सांगितला आहे, असे उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना दु:ख

उज्जैनच्या महाकाळ मंदिरात झालेल्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in