
नवी दिल्ली : देशातील आयआयटीसाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या ‘जेईई-मेन’ परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांना १०० गुण मिळाले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेने दिली. १४ पैकी १२ जण खुल्या प्रवर्गातील असून एक ओबीसी, एक अनुसूचित जातीतील आहे.
या परीक्षेला १२.५८ लाख विद्यार्थी बसले होते. १०० गुण मिळवणारे पाच जण राजस्थानचे, दिल्ली व उत्तर प्रदेशचे प्रत्येकी दोघे जण; कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात व तेलंगणाचा प्रत्येकी एक जण आहे.
ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली, तेलगू, उर्दू, तमिळ आदी १३ भाषांमध्ये घेण्यात आली. भारतासह जगातील १५ देशांमध्ये ही परीक्षा आयोजित केली होती.
आता ‘जेईई-ॲॅडव्हान्स’ ही परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. ‘जेईई मेन्स’मधील विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेसाठी होणार आहे. या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेशाचे द्वार खुले होते.