१४६ विरोधी खासदारांचे निलंबन अखेर रद्द

निलंबित सदस्यांनी आपल्या वागुणकीबाबत पश्चात्ताप व्यक्त केल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या समित्यांनी त्यांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता हे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
१४६ विरोधी खासदारांचे निलंबन अखेर रद्द

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रचंड गोंधळ घालून लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या लोकसभेतील १०० व राज्यसभेतील ४६ अशा एकूण १४६ खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी दिली. निलंबित सदस्यांनी आपल्या वागुणकीबाबत पश्चात्ताप व्यक्त केल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या समित्यांनी त्यांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता हे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

विरोधी पक्षांमधील एकूण १४६ खासदार डिसेंबर महिन्यातील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. पैकी १०० खासदार लोकसभेतील, तर उर्वरित ५० खासदार राज्यसभेतील आहेत. सभागृहात फलक आणणे आणि सातत्याने कामकाजात अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन संपले होते. त्यानंतर निलंबित खासदारांचे प्रकरण दोन्ही सभागृहांच्या हक्कभंग समितीकडे वर्ग करण्यात आले होते. समित्यांनी केलेल्या शिफारशीनुसार या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सर्व खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा केली. आम्ही सरकारच्या वतीने लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापती यांना विनंती केली आहे. त्यांनी देखील होकार दिला आहे. मात्र सर्व पक्षांच्या खासदारांनी सभागृहांच्या नियमांचे पालन करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. सर्वपक्षीय बैठकीस आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना ही बाब सूचित करण्यात आली आहे. खासदारांनी फलक आणि अन्य साहित्य सभागृहात आणू नये, असेही सांगण्यात आल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. बुधवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in