१७ दिवसांत १२ पूल कोसळले, १५ अभियंते निलंबित; कुठं घडला प्रकार? जाणून घ्या

गेल्या १७ दिवसांत एकापाठोपाठ एक असे तब्बल १२ पूल कोसळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नेमका कुठं घडला हा प्रकार?
१७ दिवसांत १२ पूल कोसळले, १५ अभियंते निलंबित; कुठं घडला प्रकार? जाणून घ्या
Published on

पटना: गेल्या १७ दिवसांत एकापाठोपाठ एक असे तब्बल १२ पूल कोसळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बिहार सरकारनं वारंवार पूल कोसळण्याच्या घटनांनंतर मोठी कारवाई केली असून १५ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने नवीन पुलांच्या पुनर्बांधणीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चैतन्य प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नऊ पुलांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील सहा फार जुने आहेत. तीन अन्य पुलांचं बांधकाम सुरू आहे. यामध्ये अभियंते आणि कंत्राटदारांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबतचा चौकशी अहवाल मिळाल्याचं त्यांनी सांगितले. अभियंत्यांकडून सदर कामाकडं लक्ष दिलं जात नव्हते. याप्रकरणी विविध पदांवरील १५ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव चैतन्य प्रसाद यांनी नवीन पूल बांधण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय राज्य पूल निर्माण निगमला लवकरात लवकर देखभाल व दुरुस्तीची विनंती करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सर्वाचा खर्च ठेकेदार मातेश्वरी कन्स्ट्रक्शनला करावा लागणार आहे.

ठेकेदारावर होणार कारवाई-

माध्यमांशी बोलताना ग्रामीण कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक सिंह म्हणाले की, सध्या तीन पुलांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. १८ जून रोजी अररियातील बाखरा नदीवरील पुलाचे नुकसान झाले. राज्य आणि केंद्राची पथके तपास करत आहेत. चार अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर अन्य दोघांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदारांची देय रक्कम थांबवले जाईल. तपासणी पथकांनी अंतिम अहवाल दिल्यानंतर कंत्राटदार आणि सल्लागारावर अंतिम कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

अतिरिक्त मुख्य सचिव दीपक सिंह म्हणाले की, पुलाचे बांधकाम सुरू आहे. कथित तोडफोडीप्रकरणी ठेकेदाराने काही स्थानिक लोकांविरुद्ध आधीच एफआयआर दाखल केला होता. १५ जूननंतरही बांधकाम का केले जात आहे, याबाबत आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. दीपक सिंह म्हणाले की आणखी काही पूल आहेत, ज्याची माहिती घेणं बाकी आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाकडून त्याची माहिती घेत आहोत.

logo
marathi.freepressjournal.in