आसाममध्ये १५ पूरबळी, सहा लाख नागरिक प्रभावित

आसाममधील पूरस्थिती कायम असून १० जिल्ह्यांतील सहा लाखांहून अधिक लोक पाण्याखाली गेले आहेत. तर २८ मे पासून पूर आणि वादळात मरण पावलेल्यांची संख्या १५ वर गेली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
आसाममध्ये १५ पूरबळी, सहा लाख नागरिक प्रभावित
PTI

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती कायम असून १० जिल्ह्यांतील सहा लाखांहून अधिक लोक पाण्याखाली गेले आहेत. तर २८ मे पासून पूर आणि वादळात मरण पावलेल्यांची संख्या १५ वर गेली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक भागातील बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास भाग पाडले आहे. कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या. हैलाकांडी होजई, मोरीगाव, करीमगंज, नागाव, कचार, दिब्रुगढ, गोलाघाट, कार्बी आंगलाँग पश्चिम आणि दिमा हासाओ जिल्ह्यातील एकूण सहा लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. नागाव हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा राहिला आहे. त्यानंतर होजई आणि कचर यांचा क्रमांक लागतो. एकंदर ४० हजारांहून अधिक विस्थापित लोक विविध जिल्ह्यांतील मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि लोकांसह अनेक संस्थांद्वारे बचाव आणि मदत कार्य केले जात आहे. राज्यातील अनेक भागांतील रस्ते आणि रेल्वे दळणवळण विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यू हाफलांगच्या चंद्रनाथपूर सेक्शनमधील ट्रॅकचे नुकसान आणि लुमडिंग विभागातील सिलचर स्टेशनवर पाणी साचल्यामुळे, शनिवार ते सोमवारपर्यंत किमान १० गाड्या रद्द करण्यात आल्या, असे ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in