
उरण : देशातील सर्वात लांब सागरी पूल अटलबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतूवरून १५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही चोरी २० जानेवारी २०२४ ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुलाच्या पॅकेज-३ मधील जासई ते चिर्ले दरम्यान घडली. या परिसरात लावण्यात आलेले ७ अॅक्सिस कंट्रोलर डोअर आणि इतर मौल्यवान साहित्य अज्ञात चोरांनी चोरून नेले.
चोरीची एकूण किंमत १५,०१,१७१ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुलाच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या लार्सन अँड टुर्बो (L&T) कंपनीकडून राजेंद्र तुकाराम मोहिते यांनी ही तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी पुलावरील ॲक्सिस कंट्रोलर डोअरच्या सिंक्रोनायझेशनसाठी गेले असताना, १५८ पैकी ७ डोअर गायब असून त्यासोबत लॉक्स, कंट्रोलर्स, सेन्सर्स, एक्झिट स्विचेस व डोअर हँडल्सदेखील चोरीला गेले होते.
कंपनीने हे डोअर २० जानेवारी २०२४ रोजी बसवले होते आणि पुलाची देखभाल ५ जानेवारी २०२६ पर्यंत कंपनीच्या जबाबदारीत आहे. या चोरीमुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.