भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात पीएफआयच्या १५ सदस्यांना फाशी

हत्या करणारे सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टर इस्लामी संघटनेचे सदस्य आहेत.
भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणात पीएफआयच्या १५ सदस्यांना फाशी
Published on

अलप्पुझा (केरळ) : केरळमधील भाजपचे ओबीसी नेते रंजीत श्रीनिवास यांची २०२१ रोजी राहत्या घरात शिरून पत्नी व कुटुंबीयांसमोर निर्घृण हत्या करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या १५ क्रूर हत्याऱ्यांना अलप्पुझा येथील मावेलीकर जिल्हा न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा ठोठावली. हत्या करणारे सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कट्टर इस्लामी संघटनेचे सदस्य आहेत. शनिवारी न्यायालयाने या १५ जणांवर दोषारोप ठेवले होते. मंगळवारी मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

उपलब्ध माहितीनुसार, पंधरापैकी आठ आरोपी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते, तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना मदत केली होती. फाशी झालेल्यांमध्ये अजमल, अनुप, मोहम्मद अस्लम, अब्दुल कलाम ऊर्फ सलाम, सफरुद्दीन, मन्शद जसीब राजा, नवाज, समीर, नझीर, अब्दुल कलाम, झाकीर हुसैन, शाजी, नैसम आणि शेरनास अश्रफ या १५ आरोपींचा समावेश आहे. अलप्पुझा येथील राहत्या घरात कुटुंबीयांसमोरच आरोपींनी रंजीत यांना ठार केले होते. केंद्र सरकारकडून पीएफआय संघटनेवर २०२२ साली बंदी घालण्यात आली होती.

रंजीत यांच्या पत्नी लिशा यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले. “हे फक्त एक हत्येचे प्रकरण नाही, तर अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. माझ्या डोळ्यादेखत माझ्या पतीवर हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, अशी सल लिशा यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in