रायपूर : राज्यात काँग्रेसची सत्ता कायम राहिल्यास ‘छत्तीसगड गृहलक्ष्मी योजना’ सुरू करण्यात येईल. यानिमित्त महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी १५ हजार रुपये टाकले जातील, अशी घोषणा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वर्षाला १२ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.
बघेल म्हणाले की, छत्तीसगड गृहलक्ष्मी योजनेत दरमहा १५ हजार रुपये येतील. त्यासाठी फॉर्म किंवा रांग लावावी लागणार नाही. सरकार स्वत: सर्व्हे करेल. सर्व ऑनलाईन राहील. थेट तुमच्या बँक खात्यात पैसे येतील. छत्तीसगडमधील गरिबी कमी व्हावी या संकल्पाने आम्ही पाच वर्षे काम केले. दिवाळीच्या शुभदिवशी आम्ही आई व बहिणींना समृद्ध व सक्षम पाहू इच्छितो, असे बघेल म्हणाले. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, पक्षाने महिलांकडून ‘महतारी वंदन योजना’ याचे फॉर्म भरायला सुरुवात केली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी ७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान झाले. आता १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.