
नवी दिल्ली : सायबर सुरक्षेच्या जगतात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. तब्बल १६ अब्जहून अधिक पासवर्ड्स ऑनलाइन लीक झाले असल्याने सायबर सुरक्षेच्या जगतात मोठी खळबळ माजली आहे. ही इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठ्या ‘डेटा लीक’पैकी एक मानली जात आहे.
सायबरन्यूज आणि फोर्ब्जच्या अहवालानुसार, या ‘लीक’मुळे जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा धोक्यात आला आहे. यामुळे फिशिंग स्कॅम्स, ओळख चोरी आणि खाती हॅक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
माहिती कशी मिळविली?
सायबर तज्ज्ञांच्या मते, ही जुनी माहिती नाही. ती ‘इन्फोस्टीलर्स’ नावाच्या ‘मालवेअर’द्वारे गोळा करण्यात आली आहे. हे ‘मालवेअर’ गुपचूपपणे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसेसवरून युजरनेम व पासवर्ड्स चोरण्याचे काम करते आणि ही माहिती हॅकर्सपर्यंत पोहचवते. त्यानंतर ही माहिती ‘डार्क वेब’वर विक्रीसाठी टाकली जाते.
‘लीक’ धोकादायक का?
डेटा व्यवस्थित आणि वापरण्यास सोपा आहे. १६ अब्जाहून अधिक अकाऊंटची माहिती एकत्र आलेली आहे. अगदी थोड्याशा रकमेने व कमी तांत्रिक ज्ञान असलेल्यांनाही ही माहिती खरेदी करता येते. त्यामुळे सामान्य वापरकर्त्यांपासून ते कंपन्या व संस्थांपर्यंत सर्वजण या धोक्याच्या विळख्यात आहेत.
सल्ला काय?
गुगलने पारंपरिक पासवर्डऐवजी पास की वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ‘एफबीआय’ने एसएमएस किंवा ई-मेलद्वारे आलेल्या संकेतस्थळांवरील लिंक्सवर क्लिक न करण्याचा, विशेषतः ‘लॉगइन डिटेल्स’ विचारणाऱ्या लिंकपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
तज्ज्ञांनी सुचवले उपाय
तुमचे सर्व महत्त्वाचे अकाऊंट्सचे पासवर्ड त्वरित बदला, प्रत्येक अकाऊंटसाठी वेगळा, मजबूत पासवर्ड वापरा, २ फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा, पासवर्ड मॅनेजर अॅप्स वापरून पासवर्ड सुरक्षित ठेवा, डार्क वेब मॉनिटरिंग टूल्सचा वापर करून तुमची माहिती ‘लीक’ झाली आहे का हे तपासा. ही ‘लीक’ म्हणजे जगभरातील सायबर गुन्ह्यांचा नकाशा आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना अधिक दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे.
या ‘लीक’मध्ये नेमके काय आहे?
या ‘लीक’मध्ये ई-मेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स (गुगल, फेसबुक, टेलिग्राम), डेव्हलपर अकाऊंट्स आणि काही शासकीय पोर्टल्स यांसारख्या अनेक सेवा व संकेतस्थळांची लॉगइन माहिती समाविष्ट आहे. ‘लीक’ करण्यात आलेली माहिती साइटचा दुवा, युजरनेम व पासवर्ड या स्वरूपात व्यवस्थितपणे मांडलेली आहे, ज्यामुळे हॅकर्ससाठी ही माहिती वापरणे अधिक सोपे होते.