उन्नाव : आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर बुधवारी दिल्लीकडे जाणाऱ्या एका दुमजली बसने दुधाच्या टँकरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १८ जण ठार झाले, तर अन्य १९ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोजीकोट गावाजवळ पहाटे ५ वाजता ही दुर्घटना घडली.
बिहारच्या मोतिहारी येथून ही बस येत होती, चालक वेगाने ही बस चालवत होता आणि तिने पाठीमागून दुधाच्या टँकरला धडक दिली असे घटनेची पाहणी केल्यावर दिसून येते, असे जिल्हा दंडाधिकारी गौरांग राठी यांनी सांगितले. या दुर्घटनेत १८ जण ठार झाले, तरअन्य १९ जण जखमी झाले. बसमध्ये जवळपास ६० प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. किरकोळ जखमींना दुसऱ्या बसने दिल्लीकडे रवाना करण्यात आले.
मृतांमध्ये १४ पुरुष, तीन महिला आणि एका लहानग्याचा समावेश आहे, असे लखनऊचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. बी. शिराडकर यांनी सांगितले. जोरदार धडकेमुळे बस आणि टँकर उलटले, मृतांमध्ये दोन्ही वाहनचालकांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत १४ मृतांची ओळख पटली आहे. बस आणि टँकर रस्त्यावर उलटले त्याच्या शेजारी काचेचे तुकडे आणि प्रवाशांचे सामान विखुरले होते, क्रेनच्या सहाय्याने बस आणि टँकर व्यवस्थित उभे करण्यात आले आणि त्यानंतर दोन्ही गाड्या टोइंग करून नेण्यात आल्या.
राष्ट्रपती, मोदींकडूनशोक व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश आदित्यनाथ यांनी संबंधितांना दिले आहेत.