
सुकमा : केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा संपूर्ण नि:पात करण्याचा विडा उचलला असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी छत्तीसगडच्या सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यावेळी सुरक्षा दलाचे चार कर्मचारीही जखमी झाले. मृतांमध्ये ११ महिला नक्षलवादी आणि २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचाही समावेश असून त्याचे नाव कुहदामी जगदीश असे आहे.
जिल्हा राखीव दल (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केरलापल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादविरोधी मोहीम हाती घेतली असताना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार सुरू झाला. काही वेळाने गोळीबार थांबल्यानंतर सुरक्षा दलांना तेथे १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. अद्यापही चकमक सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शस्त्रसाठा हस्तगत
केरलपाल येथील जंगलात मोठ्या प्रमाणावर नक्षलादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्रीपासूनच संयुक्त कारवाई सुरू केली. त्यानंतर शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी मारले गेले असून त्यांच्याकडून एके-४७ रायफल, एसएलआर, इनसास रायफल, .३०३ रायफल, एक रॉकेट लॉन्चर आणि बॅरल ग्रेनेड लॉन्चर आणि स्फोटक साहित्य, असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
१३० हून अधिक ठार
नव्या वर्षात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहेत. तसेच सीमाभागात अंतर्गत बैठकाही घेत आहेत. यावर गुप्तचर यंत्रणेचे लक्ष असल्याने नक्षलवाद्यांच्या अनेक योजना फोल ठरत आहेत. तीन महिन्यांत छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात झालेल्या विविध चकमकीत १३० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी जहाल नक्षल नेता मुरलीही ठार झाला होता. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविण्याची घोषणा केल्यानंतर सध्याच्या घडीला छत्तीसगडमध्ये बस्तर फायटर, सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी कारवाया पार पाडत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाल्याचे चित्र आहे.
शांतता, विकासानेच बदल घडेल - गृहमंत्री
शस्त्रे हाती घेऊन हिंसाचार घडविणाऱ्या शक्ती बदल घडवू शकत नाहीत, केवळ शांतता आणि विकास यामुळेच बदल घडेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले. सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये १६ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादाचा पूर्णपणे नि:पात करण्याचा विडा उचलला आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. ज्यांच्या हाताता शस्त्रे आहेत आणि जे हिंसाचार घडवत आहेत ते बदल घडवू शकत नाहीत, केवळ शांतता आणि विकास यामुळेच बदल घडेल, असे शहा म्हणाले.