१९८४ ची शीखविरोधी दंगल, सज्जनकुमार यांना जन्मठेप; सीबीआय, तक्रारदारांनी केली होती फाशीची मागणी

दिल्लीत १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१९८४ ची शीखविरोधी दंगल, सज्जनकुमार यांना जन्मठेप; सीबीआय, तक्रारदारांनी केली होती फाशीची मागणी
Published on

नवी दिल्ली : दिल्लीत १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सज्जन कुमार यांना १ नोव्हेंबर १९८४ या दिवशी सरस्वती विहार या ठिकाणी झालेल्या वडील व मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआय आणि तक्रारदारांनी सज्जनकुमार यांना फाशी देण्याची मागणी केली होती.

पंजाबमध्ये झालेल्या ऑपरेशन ‘ब्ल्यू स्टार’नंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर १ नोव्हेंबरच्या दिवशी राजधानी दिल्लीत शिखांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराचा उद्रेक झाला. या हिंसाचारात शीख समाजातील लोक आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आले होते. १ नोव्हेंबर १९८४ रोजी उसळलेल्या दिल्ली दंगलीत सरस्वती विहारमध्ये जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग या दोन शीख व्यक्तींची हत्या झाली. याप्रकरणी पीडितांच्या पत्नी आणि आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ज्या जमावाने जसवंत आणि तरुणदीप सिंग यांची हत्या केली, त्याचे नेतृत्व सज्जनकुमार करत होते, असा आरोप करण्यात आला होता.

कोण आहेत सज्जनकुमार?

सज्जनकुमार हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते तीनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेलेले आहेत. सज्जनकुमार यांनी १९७७ मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले. अत्यंत कमी कालावधीतच त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचा विश्वास संपादित केला होता. शीख अंगरक्षकांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्यानंतर सज्जनकुमार यांनी शिखांविरोधात दंगल भडकवण्याचे काम केले, असा त्यांच्यावर आरोप आहे. शीख दंगलीनंतर १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही सज्जनकुमार यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला होता.

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये संघटित हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी न्या. रंगनाथ मिश्रा आयोगाची स्थापना केली होती. ९ सप्टेंबर १९८५ रोजी तक्रारदारांनी आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपला जबाब नोंदवला होता.

logo
marathi.freepressjournal.in