

नवी दिल्ली : देशात १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित जनकपुरी आणि विकासपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या हिंसाचारात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. ठोस पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या हिंसाचारात दोन शीख व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांच्यावर जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप होता. मात्र, सुनावणीदरम्यान सज्जन कुमार यांनी आपण निर्दोष असल्याचे आणि या हिंसाचारात आपला कोणताही सहभाग नसल्याचे वारंवार सांगितले होते.
न्यायालयाचे निरीक्षण
राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी आपला निकाल देताना स्पष्ट केले की, आरोपींविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले आहे. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने सज्जन कुमार यांना या प्रकरणातून मुक्त केले आहे.
सज्जन कुमार यांची सद्य:स्थिती
सज्जनकुमार यांची जरी या प्रकरणात त्यांची सुटका झाली असली तरी सध्या दुसऱ्या एका दंगल प्रकरणात (राज नगरमधील पाच लोकांची हत्या) ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. २०१७ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना त्या प्रकरणात दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.