पहिली स्लीपर वंदे भारत; जोधपूर-दिल्ली-मुंबई दरम्यान

देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही आधुनिक सुविधांनी युक्त लक्झरी प्रीमियम ट्रेन असेल.
पहिली स्लीपर वंदे भारत; जोधपूर-दिल्ली-मुंबई दरम्यान
PM

नवी दिल्ली : वंदे भारत रेल्वेगाडीला देशातील प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना लवकरच स्लीपर वंदे भारत ही नवी गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी सादर करण्यात येणार आहे. स्लीपर वंदे भारतची चाचणी काही दिवसांमध्ये सुरू होऊ शकते. त्यानंतर या स्लीपर वंदे भारत रेल्वेगाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पहिली स्लीपर वंदे भारत जोधपूर-दिल्ली-मुंबई या मार्गावर धावणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन जोधपूर येथून सुरू होईल, असा कयास आहे. जोधपूर ते दिल्ली आणि मुंबई दरम्यान ही ट्रेन धावेल. पहिल्या टप्प्यात देशाला अशा तीन स्लीपर वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. या ट्रेनला १६ ते २४ डबे असतील. मार्च महिन्यापर्यंत ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन ही आधुनिक सुविधांनी युक्त लक्झरी प्रीमियम ट्रेन असेल. प्रत्येक कोचमध्ये टॉयलेट आणि एक मिनी पॅन्ट्री असेल. याशिवाय कोचमध्ये आरामदायी आसनव्यवस्था असेल. ही ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणार आहे. पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये जवळपास ८२३ बर्थ असतील. या १६ डब्यांपैकी ११ एसी-थ्री टायर, ४ एसी टू-टायर आणि एक फर्स्ट क्लास कोच असेल. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बर्थ राखीव असेल. जोधपूर ते दिल्ली या ट्रेनचे भाडे १२०० ते २००० रुपयांपर्यंत असू शकते, असा अंदाज आहे. दरम्यान, स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या कर्मचारी आणि अभियंत्यांना जोधपूरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशभरात सुरू होणाऱ्या सर्व स्लीपर वंदे भारत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र जोधपूरमध्ये असू शकेल, असा दावा केला जात आहे. जोधपूरमध्ये नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in