

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ फेरपरीक्षा २१ जून रोजी घेण्यात आली, मात्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण २२.७९ लाख उमेदवारांपैकी तब्बल २.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे वृत्त आहे. फेरपरीक्षेचा निकाल आगामी २० जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) तात्पुरत्या उत्तरतालिकेवरील हरकतींचा आढावा घेतल्यानंतर आता मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली आहे.
गेल्या ३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण २२.७९ लाख उमेदवारांपैकी सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास ८८ टक्के होती, जी मूळ परीक्षेतील ९६ टक्क्यांहून अधिक उपस्थितीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. पेपरफुटीच्या वादामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अल्प कालावधीत पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याचे आव्हान, या कारणांमुळे उपस्थिती घसरल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.