विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात विशेष कृती दलाचे (एसटीएफ) दोन जवान शहीद झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी दु:ख व्यक्त केले असून, या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असे सांगितले. नक्षलवादाविरुद्धचा लढा सुरूच राहील, असेही ते म्हणाले. विजापूर-दंतेवाडा-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवरून संयुक्त दलाचे पथक परतत असताना बुधवारी रात्री तारेम परिसरात बुधवारी हा स्फोट घडविण्यात आला. त्यामध्ये विशेष कृती दलाचे दोन कॉन्स्टेबल भरत साहू आणि सत्यारसिंह कांगे हे शहीद झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेनंतर घटनास्थळी अधिक कुमक पाठविण्यात आली आहे.