नवी दिल्ली : अतिवृष्टीग्रस्त हिमाचल प्रदेशच्या मदतीसाठी केंद्र सरकारने शनिवारी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तत्पूर्वी राज्य सरकारने संपूर्ण राज्याला आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले होते.
हिमाचल प्रदेशला यंदा पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. राज्यात आतापर्यंत पावसाचे एकूण ३३० बळी गेले आहेत. राज्याला या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून आगाऊ मदत म्हणून २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापूर्वी १० जुलै आणि १७ जुलै रोजी दोन हप्त्यांत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतील केंद्राच्या हिश्श्यापोटी ३६०.८० कोटी रुपये दिल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतील राज्याच्या मागील शिल्लकीपोटी ७ ऑगस्ट रोजी १८९.२७ कोटी रुपये देण्यात आले होते. केंद्रीय पथकांनी १९ आणि २१ जुलै रोजी राज्याचा पाहणी दौरा केला होता.