Chandrayaan-4: 'चांद्रयान-४' मोहिमेला मंजुरी; २,१०४ कोटींची तरतूद

चंद्रावर लैंडर आणि रोव्हर यशस्वीरित्या उतरवणाऱ्या चांद्रयान मोहिमेच्या विस्ताराला आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याचबरोबर व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान मोहिम, भारतीय अंतरिक्ष स्थानकाचा विकास आणि पुढील पिढीचे प्रक्षेपण यान विकसित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यातआला.
Chandrayaan-4: 'चांद्रयान-४' मोहिमेला मंजुरी; २,१०४ कोटींची तरतूद
ANI
Published on

चंद्रावर लैंडर आणि रोव्हर यशस्वीरित्या उतरवणाऱ्या चांद्रयान मोहिमेच्या विस्ताराला आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याचबरोबर व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान मोहिम, भारतीय अंतरिक्ष स्थानकाचा विकास आणि पुढील पिढीचे प्रक्षेपण यान विकसित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यातआला.

'चांद्रयान-४' या मोहिमेसाठी तब्बल एकूण २,१०४.०६ कोटी रुपयांची आवश्यकता असणार असून या निधीला मान्यता देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. अंतराळयानाचा विकास आणि प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जबाबदार असेल. ही मोहीम आता मान्यता दिल्यानंतर पुढील ३६ महिन्यांत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने पूर्ण केली जाईल. तसेच यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे तंत्रज्ञान स्वदेशी पद्धतीने विकसित करण्याची संकल्पना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘चांद्रयान-४’ मोहीम अतिरिक्त घटकांसह विस्तारित करण्यात आली असून आता पुढची पायरी म्हणजे चंद्रावर जाणारी मानव मोहीम असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

चांद्रयान-३ च्या यशानंतर, केंद्र सरकारने चांद्रयान-४ साठी २,१०४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये ३६ महिन्यांच्या मिशन टाइमलाइनसह चंद्रावरील खडक आणि माती पृथ्वीवर आणणे समाविष्ट आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येकी पाच ‘मॉड्युल’ असलेले दोन अंतराळयान ‘स्टॅक’ असणार आहेत. तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ‘चांद्रयान-४ मिशन’ येत्या ३६ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. दरम्यान, ‘स्टॅक १’ चंद्राच्या नमुना संकलनावर लक्ष केंद्रित करेल, तर ‘स्टॅक २’ पृथ्वीवर नमुने हस्तांतरण आणि पुनर्प्रवेश हाताळेल.

दरम्यान, या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे आहे. तसेच तेथील नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर परत आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे. ‘चांद्रयान ४’मध्ये चंद्राच्या कक्षेत जटील डॉकिंग आणि अनडॉकिंग ऑपरेशन्सचा समावेश असेल. ज्यामुळे भारताच्या अंतराळ क्षमतांमध्ये लक्षणीय प्रगती होईल. इस्रोने एप्रिल २०१४ मध्येच ‘चांद्रयान-४’ची योजना आखली होती. ज्यामध्ये दोन रॉकेट ‘एलव्हीएम-३’ आणि ‘पीएसएलव्ही’ पाठवण्याचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in