भारतातील क्रीडा विकासासाठी २१५ कोटींच्या करारावर स्वाक्षरी

या कराराअंतर्गत एनटीपीसीकडून पुढील पाच वर्षात ११५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे
भारतातील क्रीडा विकासासाठी २१५ कोटींच्या  करारावर स्वाक्षरी

भारतातील क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय क्रीडा विकास निधीने (एनएसडीएफ) एनटीपीसी (राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) फाउंडेशन आणि आरईसी (ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ) फाउंडेशन या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत (पीएसयू) २१५ कोटींच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे हा करार पार पडला.

या कराराअंतर्गत एनटीपीसीकडून पुढील पाच वर्षात ११५ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ते भारतातील तिरंदाजी क्रीडा प्रकाराला पाठबळ देईल. आरईसी फाउंडेशन महिला हॉकी, ॲथलेटिक्स आणि मुष्टियुद्ध खेळाला सहाय्य करण्यासाठी तीन वर्षांमध्ये १०० कोटी रुपयांचे सहाय्य करणार आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून एनएसडीएफला हे पाठबळ मिळाले आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या दोन सार्वजनिक उपक्रमांनी क्रीडा विकासासाठी एकूण २१५ कोटी रुपयांचे योगदान दिले असून हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, असे यावेळी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले. कॉर्पोरेट्सपासून ते व्यक्तींपर्यंत आणि विविध संस्थांपासून ते राज्यांपर्यंत प्रत्येकाने एक संघ म्हणून एकत्र काम केले पाहिजे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने आपल्या क्रीडापटूंना मोठे प्रोत्साहन मिळेल, असे ठाकूर यांनी सांगितले.

एनटीपीसी आणि आरईसीच्या माध्यमातून भारतातील क्रीडा क्षेत्राच्या पुढील विकासासाठी काहीतरी योगदान दिल्याबद्दल ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, असे आर के सिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देताना नमूद केले. देशात क्रीडा संस्कृती निर्माण करणे हा राष्ट्र उभारणीचा भाग आहे, असे सांगत आमचे मंत्रालय देशातील क्रीडा विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल'' अशी ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in