२२ टक्के महाग झालेला गहू स्वस्त होणार; गव्हाच्या आयातीवरील ४० टक्के शुल्काची कपात होण्याची शक्यता
गव्हाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची योजना आहे. यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवरील ४० टक्के शुल्क हटवू शकते. यासोबतच व्यापाऱ्यांच्या साठ्यावरही मर्यादा घातली जाऊ शकते. गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारतात किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. मे महिन्यात कडक उन्हामुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
देशांतर्गत किमती उंचावल्या आहेत. सरकारने आयात शुल्क हटवले आणि आंतरराष्ट्रीय किमती घसरल्यास सणासुदीच्या काळात आयात सुरू होऊ शकते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सणासुदीत देशांतर्गत बाजारात भाव चढे होतात. केंद्र सरकार गव्हाच्या किमती खाली आणण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका वर्षात गव्हाच्या भावात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ८ ऑगस्ट २०२१ रोजी गहू २५ रुपये प्रति किलो होता, तो सोमवारी ३०.६१ रुपये किलोवर पोहोचला आहे. महिनाभरापूर्वी तो २९.७६ रुपये किलो होता. पिठाचा भाव वर्षापूर्वी २९.४७ रुपये होता, तो आता ३५.१३ रुपये झाला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात जुलै महिन्यात गव्हाच्या किमतीत १४.५ टक्क्यांनी घट झाली होती. गेल्या वर्षी भारताने ७२ लाख टन गव्हाची निर्यात केली होती. यंदा ६० लाख टन निर्यात होण्याचा अंदाज आहे.