प्रत्यक्ष कर संकलनात २४ टक्क्यांनी वाढ - अर्थ मंत्रालय

गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून सात टक्क्यांवर आणला
प्रत्यक्ष कर संकलनात २४ टक्क्यांनी वाढ - अर्थ मंत्रालय

प्रत्यक्ष कर संकलनात २४ टक्के वाढ होऊन १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ते ८.९८ लाख कोटी रुपये झाले आहे, असे अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे. याशिवाय, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर दरम्यान कॉर्पोरेट उत्पन्नावरील एकूण संकलन १६.७४ टक्क्यांनी वाढले आहे. वैयक्तिक आयकर संकलनात ३२.३० टक्के वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन ८.९८ लाख कोटी रुपये झाले असून ते मागील वर्षीच्या याच कालावधीतील कर संकलनाच्या तुलनेत २३.८ टक्के जास्त आहे. रिफंडची रक्कम वगळल्यानंतर प्रत्यक्ष कर संकलन ७.४५ लाख कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीतील संकलनापेक्षा १६.३ टक्के जास्त आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून सात टक्क्यांवर आणला आहे. इतर पतमापन संस्थांनीही भू-राजकीय दबाव आणि मंदीची चाहूल लागल्याने जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी)ने म्हटले आहे की, एकूण महसूल संकलनाच्या बाबतीत, आतापर्यंत कॉर्पोरेट आयकर (सीआयटी) आणि वैयक्तिक आयकर (पीआयटी आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच एसटीटी)ची वाढ अनुक्रमे १६.७३ टक्के आहे आणि ३२.३० टक्के आहे.

परताव्यासाठी समायोजन केल्यानंतर, सीआयटी संकलनात निव्वळ वाढ १६.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचते. वैयक्तिक आयकर संकलनातील वाढ १७.३५ टक्के (केवळ पीआयटी) आणि एसटीटीसह १६.२५ टक्के आहे.

सीबीडीटीने म्हटले आहे की, यंदा १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण १.५३ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षाच्या याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत ८१ टक्के जास्त आहे.

मालाच्या निर्यातीत गेल्या वर्षी झालेल्या वाढीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरमध्ये कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये वस्तूंच्या निर्यातीत ३.५ टक्क्यांनी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत व्यापार तूट जवळपास दुप्पट झाली आहे. जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन (आयआयपी) वाढ २.४ टक्क्यांवर घसरली. त्याच वेळी, मूलभूत उद्योगाची वाढ ऑगस्टमध्ये ३.३ टक्क्यांच्या नऊ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in