शिक्षकांना प्रशिक्षण देणारी देशात २५०० महाविद्यालये उभारावीत ;उद्योगपती नारायण मूर्ती यांची मागणी

या प्रशिक्षणाचा खर्च तुम्हाला महाग वाटत असल्यास हावर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डेरेक बोक यांचे विधान तुम्ही लक्षात ठेवायला हवे
शिक्षकांना प्रशिक्षण देणारी देशात २५०० महाविद्यालये उभारावीत ;उद्योगपती नारायण मूर्ती यांची मागणी
Published on

बंगळुरू : राष्ट्रीय शिक्षण धोरण यशस्वी करायचे असल्यास विकसित देशातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित शिकवणाऱ्या १० हजार निवृत्त शिक्षकांना भारतात आमंत्रित करायला हवे. तसेच देशातील २८ राज्यात शिक्षकांना प्रशिक्षण देणारी २५०० महाविद्यालय उभारली जावीत, अशी मागणी उद्योगपती नारायण मूर्ती यांनी केली.

इन्फोसिस विज्ञान फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘इन्फोसिस प्राईज २०२३’ च्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, शिक्षक व संशोधकांचा सन्मान केला जावा. त्यांना चांगले वेतन दिले पाहिजे. ते आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे इन्फोसिस प्राईज योजना सुरू करण्यात आली. भारतात संशोधनाला वाव देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

मूर्ती म्हणाले की, वर्षाला चार प्रशिक्षकांनी १०० प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे. त्यातून आपल्याला २,५०,००० प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देता येऊ शकेल. त्यानंतर माध्यमिक शाळातील २,५०,००० शिक्षकांना याच पद्धतीने शिकवता येईल. भारतात प्रशिक्षीत झालेले हे शिक्षक पाच वर्षात चांगले मार्गदर्शक बनू शकतात, असे ते म्हणाले.

प्रत्येक निवृत्त शिक्षकाला भारताने वर्षाला १ लाख डॉलर्स (८३ लाख) रुपये पैसे द्यावेत. म्हणजेच सर्व शिक्षकांवर ८३०० कोटी खर्च करावेत. २० वर्षे चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबीरासाठी २० अब्ज डॉलर्स खर्च होतील. भारताने ५ ट्रिलीयन डॉलर्स जीडीपीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे ही रक्कम भारतावर मोठा आर्थिक ताण निर्माण करणार नाही, असे ते म्हणाले.

या प्रशिक्षणाचा खर्च तुम्हाला महाग वाटत असल्यास हावर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डेरेक बोक यांचे विधान तुम्ही लक्षात ठेवायला हवे. तुम्हाला शिक्षण महाग वाटत असल्यास तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा, असे नारायण मूर्ती म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in