नवी दिल्ली : २६ राफेल मरीनच्या खरेदीसाठी फ्रान्ससोबत लवकरच अंतिम करार होणार आहे. तसेच ३ स्कॉर्पिन पाणबुडीच्या करारावर अंतिम चर्चा सुरू आहे. जानेवारी २०२५ पर्यंत करारांवर स्वाक्षऱ्या होऊ शकतात, असे नौदलप्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येत्या १० वर्षांत भारतीय नौदलात ९६ युद्धनौका व पाणबुड्या सामील होतील. ६२ जहाजे व एक पाणबुडीच्या बांधणीचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत दर महिन्यात एक युद्धनौका नौदलात सामील होईल, असे त्यांनी सांगितले.
जुलै २०२३ मध्ये संरक्षण खात्याने फ्रान्सकडून राफेल मरीन विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. या विमानांना स्वदेशी युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात केले जाणार आहे.
पाकिस्तानला युद्धनौका, पाणबुड्या कशा मिळताहेत?
पाकिस्तानकडे ५० युद्धनौका आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहता त्यांच्याकडे युद्धनौका व पाणबुड्या कशा येतात हे पाहून हैराण व्हायला होते. चीन, पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व संभावित धोक्याचा मुकाबला करायला आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले.
स्वदेशी अणुपाणबुडी २०३६ ला तैनात होणार
भारतात बनणारी स्वदेशी बनावटीची पहिली अणुपाणबुडी २०३६-३७ मध्ये तयार होणार आहे. या पाणबुडीच्या निर्मितीला सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. भारतीय नौदल ६ अणुपाणबुड्या बनवणार आहे.
अणुपाणबुडीची गरज काय?
अणुपाणबुड्या महिनन् महिने पाण्याच्या आत राहू शकतात. डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांना दिवसातून एकदा बॅटरी चार्ज करायला पाण्याच्या पृष्ठभागावर आणावे लागते. त्यावेळी पाणबुडीवर हल्ला होण्याची शक्यता असते. डिझेल पाणबुडी दीर्घकाळ पाण्यात राहू शकते. मात्र तिचा वेग कमी असतो. त्यामुळेच नौदलाने अणुपाणबुडीची मागणी केली होती.
यंदाचा ‘नौदल दिन’ पुरीमध्ये
यंदाचा ‘नौदल दिन’ ओदिशातील पुरी येथे ४ डिसेंबरला साजरा होणार आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहतील.