
गुवाहाटी: आसाममध्ये महापूरानं हाहाकार माजवला आहे. पूरस्थिती गंभीर होत असून राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये १.६१ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात पुरामुळे आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे. त्याच वेळी, करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर भागात भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला, तिच्या तीन मुली आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.
पुरामुळे राज्यात २६ जणांचा मृत्यू...
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) अहवालानुसार मंगळवारी हैलाकांडी जिल्ह्यात पुराच्या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. या वर्षीच्या पुरामुळे राज्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, खासकरून करीमगंज जिल्ह्यात महापूरामळं परिस्थिती जास्त गंभीर बनली आहे. ४१, ७११ मुलांसह १.५२ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. करीमगंज जिल्ह्यातील नीलमबाजार, आरके नगर, करीमगंज आणि बदरपूर भागातील २२५ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. २२,४६४ लोकांना जिल्हा प्रशासनाद्वारे स्थापित छावण्या आणि मदत वितरण केंद्रांमध्ये हलवण्यात आलं आहे.
पुरामुळे पाळीव प्राणीही बाधित-
ASDMA पूर अहवालात म्हटलं आहे की, १५ जिल्ह्यांतील २८ महसूल मंडळांतर्गत ४७० गावे पुरामुळं प्रभावित झाली आहेत आणि ११ जिल्ह्यांमधील १३७८ हेक्टर पीक क्षेत्र पुराच्या पाण्यात बुडाले आहे. १५ जिल्ह्यांतील ९३८९५ पाळीव प्राण्यांनाही पुराचा फटका बसला आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली होती बैठक-
यापूर्वी १५ जून रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांची सुरक्षेसाठी नागरीक, पोलीस प्रशासन आणि काझीरंगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. विशेषत: पुराच्या काळात. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक पावले उचलण्यास आणि प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यास सांगितले.