छत्तीसगडमध्ये २९ नक्षलवादी ठार : चकमकीत ३ जवानही जखमी, मोठा शस्त्रसाठा जप्त, आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे ४८ तास उरले असतानाच मंगळवारी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील...
छत्तीसगडमध्ये २९ नक्षलवादी ठार : चकमकीत ३ जवानही जखमी, मोठा शस्त्रसाठा जप्त,
आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक

कांकेर (छत्तीसगड) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे ४८ तास उरले असतानाच मंगळवारी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत, असे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सांगितले.

छोटेबेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनगुंडा आणि कोरोनार गावांमधील हापतोला जंगलात दुपारी दोन वाजता नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झडली. उत्तर बस्तरमधील सीपीआय (माओवादी) गटाचे बडे कमांडर जंगलात लपल्याची खबर मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दल आणि राज्यातील जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त पथकाने हापतोला जंगलात शोधमोहीम हाती घेतली होती. नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी कांकेरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.

घटनास्थळावरून २९ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आयएनएसएएस, एके-४७, एसएलआर, कार्बाईन, .३०३ रायफल, असा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

या चकमकीत एका जवानाच्या पायाला गोळी लागली. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, असे सीमा सुरक्षा दलाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुरक्षा दलांना मिळालेल्या खबरीवरून सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा राखीव दलाने संयुक्तपणे ही शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून पथकावर गोळीबार करण्यात आला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जंगलात अद्यापही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलाचे तीन कर्मचारी चकमकीत जखमी झाले असले तरी त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी ७ नोव्हेंबर रोजी सीमा सुरक्षा दलाचा एक जवान स्फोटात जखमी झाला होता, मात्र दुसऱ्या दिवशी तो मरण पावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी छत्तीसगडच्या खैरागडमध्ये जाहीरसभा झाली. यावेळी पुढील तीन वर्षात नक्षलवादाचा पूर्णपणे बीमोड करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

छत्तीसगडमध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान

छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर कांकेरमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

मृतांमध्ये नक्षली कमांडर शंकर रावचा समावेश

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक म्होरक्या (कमांडर) शंकर राव आणि ललिता ही महिला नक्षलवादी असून त्यांच्यावर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी चकमक ठरली. त्यामध्ये विनोद गावडे हा नक्षलवादीही ठार झाला असून त्याच्यावर १० लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र

सुरक्षा दलांनी यावर्षी नक्षलवादविरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून या वर्षात आतापर्यंत ५० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे, तर नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात १८ नागरिक आणि सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in