लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करून मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

फिरायला गेलेले लष्कराचे दोन अधिकारी आणि त्यांची मैत्रीण यांच्यावर बुधवारी मध्यरात्री एका टोळक्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. तसेच अधिकाऱ्यांसोबत असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीवर या टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील महू येथे घडली.
लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करून मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना
FP Photo
Published on

इंदूर : फिरायला गेलेले लष्कराचे दोन अधिकारी आणि त्यांची मैत्रीण यांच्यावर बुधवारी मध्यरात्री एका टोळक्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले. तसेच अधिकाऱ्यांसोबत असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीवर या टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील महू येथे घडली. याप्रकरणी ६ जणांची ओळख पटली असून दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे अधिकारी येथील इन्फन्ट्री स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

इंदूरपासून ५० किमी अंतरावर महू येथील जाम गेट या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी हे अधिकारी गेले असता ही घटना घडली. दोन अधिकारी व त्यांच्या दोन मैत्रिणी या ठिकाणी फिरायला आले होते. अधिकाऱ्यांपैकी एक जण व त्याची मैत्रीण मोटारीत बसलेले असताना ६-७ जणांच्या एका टोळक्याने या दोघांवर हल्ला केला व त्यांच्याकडील बंदुकीने अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या मुलीवर बलात्कार केला़, अशी तक्रार या जखमी अधिकाऱ्यांनी नोंदविली आहे. मारेकऱ्यांनी या अधिकाऱ्यांकडे त्यांना जिवंत सोडण्यासाठी १० लाख रुपये खंडणी मागितली. सोबतच्या दुसऱ्या अधिकाऱ्याला पैशांची व्यवस्था करण्याच्या बहाण्याने फोन करण्याची संधी मिळाली. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, पण हल्लेखोरांना तोपर्यंत सुगावा लागल्याने ते नजिकच्या जंगलात पळून गेले.

जखमी अधिकाऱ्यांना महू येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे़ त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वातच राहिलेली नाही असे चित्र आहे. देशात महिलांवरील वाढत्या अत्याचारांची दखल केंद्र सरकार घेत नसून त्यामुळे महिलांचे स्वातंत्र्य आणि अपेक्षांवर बंधने आली आहेत, अशी टीका गांधी यांनी ‘एक्स’ समाज माध्यमावर केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in