अयोध्येत उसळला जनसागर; ३ लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; तितकेच भाविक रांगेत, अयोध्येकडे जाणारी वाहने रोखली

भाविकांच्या गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडली. मुख्यमंत्री योगी यांनी तातडीने अयोध्येकडे धाव घेत श्री रामजन्मभूमी परिसराचे हवाई सर्वेक्षण केले.
अयोध्येत उसळला जनसागर; ३ लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; तितकेच भाविक रांगेत, अयोध्येकडे जाणारी वाहने रोखली

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर मंगळवारी मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी भाविकांची तुफान गर्दी झाली. मंगळवारी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले, तर तितकेच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडली. मुख्यमंत्री योगी यांनी तातडीने अयोध्येकडे धाव घेत श्री रामजन्मभूमी परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याने अयोध्येकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी आठ हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती अयोध्या विभागाचे पोलीस अधिकारी पीयूष मोर्डिया यांनी दिली. भाविकांची मोठी गर्दी पाहता अयोध्येतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक जातीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हातात लाऊडस्पीकर घेऊन भाविकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, पोलीस महासंचालक प्रशांत कुमार व मुख्य गृह सचिव संजय प्रसाद हेही राम मंदिरात पोहोचले. दोन्ही अधिकाऱ्यांनी गर्दी आवरायला सुरुवात केली. गर्दी लक्षात घेऊन दुसऱ्या जिल्ह्यातून अयोध्येला जाणाऱ्या गाड्या रोखल्या जात आहेत. भक्तांना अन्य कोणत्याही दिवशी दर्शनाला येण्याचे आवाहन केले जात आहेत.

अयोध्येत जाणाऱ्या बस रोखल्या

अयोध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बाराबाकीच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांशी संपर्क करून अयोध्येकडे जाणाऱ्या बस रोखण्याचे आदेश दिले. त्यानंतर बाराबाकीच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी यूपी ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून अयोध्येकडे निघालेल्या बसेस लखनऊमध्ये थांबण्याचे आदेश दिले. दुपारी एक वाजता लखनऊच्या चारबाग, आलमबाग, कैसरबाग व अवध बस स्टेशनकडून अयोध्येकडे निघालेल्या ८० बसेस रोखण्यात आल्या.

पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी

नवीन राम मंदिरातील रामलल्लाचे दर्शन करण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. भक्तांची गर्दी पाहून मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी प्रशासनाला योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. जेव्हा स्थानिक लोक दर्शन करायला येतील, तेव्हा दिवसभर जास्त गर्दी असेल, असे एका ट्रस्टच्या सदस्याने सांगितले.

१०२ भाविकांची प्रकृती बिघडली

अयोध्येत मंगळवारी रामलल्लाच्या दर्शनाला सुरुवात झाली. गर्भगृहात मोठी गर्दी झाल्याने १०२ भाविकांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. काही जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर काहींना चक्कर येण्याबरोबरच रक्तदाबाचा त्रास झाला. ८ जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in