नेहरूंच्या काळात १२ लाखांवर ३ लाखांचा कर; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच १२ लाख रुपयांपर्यंत कोणताही प्राप्तिकर नाही. भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो मध्यमवर्गीयांचा सन्मान करतो.
नेहरूंच्या काळात १२ लाखांवर ३ लाखांचा कर; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र
एक्स @narendramodi
Published on

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच १२ लाख रुपयांपर्यंत कोणताही प्राप्तिकर नाही. भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो मध्यमवर्गीयांचा सन्मान करतो. देशाला विकसित करण्यात मध्यमवर्गीयांचा मोठा हात आहे. इमानदार करदात्यांवरील करांचा बोजा आम्ही कमी केला आहे. यापूर्वी, पंडित नेहरूंच्या काळात १२ लाख उत्पन्नावर ३ लाख रुपये कर भरावा लागत होता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली.

मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या सरकारांच्या कर धोरणावर जोरदार टीका केली. आता सामान्य माणसांसाठी भाजप सरकारने १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले. जर तुम्ही आज नेहरूंच्या काळात असता, तर १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर भरावा लागला असता, असे मोदी म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरके पुरम या ठिकाणी झालेल्या सभेत मोदी म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सच रद्द करावा, अशीही मागणी जनतेतून होत होती. परंतु, त्यांनी नवीन करप्रणालीकडे लोकांना वळवण्यासाठी १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर करमुक्तीची घोषणा केली आहे.

आमच्या सरकारने दिल्लीतील सरकारी शाळांत शिकणाऱ्या मुलांसाठी दहा हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’ची स्थापना केली आहे.तसेच ५० हजार नवीन ‘अटल टिंकरिंग लॅब’ची स्थापना करण्यासाठी तरतूद केली आहे. आमच्या सरकारने १० हजार नवीन फेलोशिप देण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.

दिल्लीत आता भाजपचे सरकार येणार आहे. दिल्लीची ‘आपदा’ म्हणजेच आप सरकारने दिल्लीच्या नागरिकांची ११ वर्षे वाया घालवली. दिल्लीकरांना माझे आवाहन आहे की, त्यांनी यावेळी भाजपला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी. मी तुम्हाला गॅरंटी देतो की, प्रत्येक नागरिकाची अडचण दूर करण्यासाठी मी मेहनत घेईन. आपल्याला दिल्लीची सेवा करणारे सरकार आणायचे आहे.”

“मोदींची गॅरंटी म्हणजे पूर्ततेची हमी. मोदी जे काही बोलतात ते करून दाखवतात. गेल्या १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था १०व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. जर परिस्थिती पूर्वीसारखीच असती तर देशाचे हे वाढते उत्पन्न घोटाळ्यांमध्ये गेले असते. काही लोकांनी ते हडप केले असते,” असेही ते म्हणाले.

...तर विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही!

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकरी, महिला, तरुण व गरीब यांना एकत्रित घेऊन जायला हवे. जो अर्थसंकल्प आम्ही मांडला त्याचा या चारही जणांना फायदा होईल. यांच्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in