
रायपूर/सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत गुरुवारी तीन नक्षलवादी ठार झाल्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले. घटनास्थळावरून आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून अद्यापही शोधसत्र सुरू आहे.
सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम राबवत असताना गुरुवारी सुकमा आणि विजापूर यामधील जंगलात ही चकमक उडाली. त्यामध्ये तीन नक्षलवादी ठार झाले. यावर्षी आतापर्यंत नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे सुरक्षा दलांमध्ये प्रचंड संताप आहे. आपण त्यांची भेट घेतली आहे. नक्षलवाद्यांचा ठरावीक कालावधीत पूर्ण बीमोड केला जाईल, असेही शर्मा म्हणाले.
स्फोटके जप्त
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांची पेरून ठेवलेली स्फोटके सुरक्षा दलांनी गुरुवारी जप्त केली. बिअरच्या बाटल्यांमध्ये ही स्फोटके ठेवण्यात आली होती.