
जम्मू - काश्मीरमध्ये बारामुल्लाच्या करेरी भागातील नजीभाट क्रॉसिंगवर बुधवारी सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी टार्गेट किलिंगच्या घटना घडवत आहेत. मंगळवारी श्रीनगरमधील सौरा भागातील अचार भागात दहशतवाद्यांनी एका पोलिसावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत त्यांची ९ वर्षांची मुलगी सफा कादरीही जखमी झाली आहे. सफाची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, सोमवारी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यापैकी तिघांचा गेल्या महिन्यात बारामुल्ला येथे झालेल्या सरपंचाच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.