३० नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची जोरदार कारवाई; एक जवान शहीद

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये बिजापूर-दंतेवाडा सीमेवर आणि कांकेर-नारायणपूर सीमेवर गुरुवारी सकाळी झालेल्या दोन चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले. बिजापूरमध्ये २६, तर कांकेरमध्ये ४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, बिजापूर येथील चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान शहीद झाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

दंतेवाडा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये बिजापूर-दंतेवाडा सीमेवर आणि कांकेर-नारायणपूर सीमेवर गुरुवारी सकाळी झालेल्या दोन चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले. बिजापूरमध्ये २६, तर कांकेरमध्ये ४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, बिजापूर येथील चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान शहीद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी नक्षलवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांची तेथे तत्काळ रवानगी करण्यात आली. दोन्ही बाजूंकडून गोळीबार अद्याप सुरूच असून, घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह व शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली जात आहेत.

बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराजन पी. म्हणाले की, गुरुवारी दुपारनंतरही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. पोलीस सातत्याने नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यात काही मोठे नक्षली नेते असू शकतात.

दुसऱ्या एका घटनेत नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर आयईडी स्फोट झाला. यात दोन जवान जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, गंगालूर भागात नक्षलवादी मोठ्या संख्येने जमा झाल्याचे कळताच दंतेवाडा-बिजापूर सीमेवर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. पोलिसांचे पथक एक दिवस आधीच या भागात पोहचले होते. गुरुवारी सकाळी चकमक सुरू झाली. बिजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव व दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, चकमक अजूनही सुरूच आहे.

देश ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलमुक्त होणार - शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, नक्षलवादमुक्त भारताच्या दिशेने काम सुरू आहे. जवानांनी आणखी एक विजय मिळवला आहे. छत्तीसगडच्या दोन चकमकींत ३० नक्षलवादी ठार झाले. मोदी सरकार नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, त्यांचा बीमोड केला जात आहे. ३१ मार्च २०२६ पूर्वी देश नक्षलवादमुक्त होणार आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in