नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या दिवाळीला अवघे १५ दिवस राहिलेले आहेत. बाजारात खरेदीसाठी धामधूम सुरू झाली आहे. येत्या दिवाळीत देशभरात ३.५ लाख कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज अ. भा. व्यापारी संघटनेने केला आहे.
दिवाळीचा सण देशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या सणामुळे व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण असते. अ. भा. व्यापारी संघटनेने (कॅट) देशातील ३० शहरात व्यापारी संघटनांच्या सहाय्याने सर्व्हेक्षण केले. व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून येणारी मागणी व आवड पूर्ण करण्यासाठी तयारी केली आहे. यंदा देशात रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्री, दसऱ्याला ग्राहकांनी भरपूर खरेदी केली. त्यामुळे दिवाळीच्या सुमारास ३.५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.
‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया व राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात ६५ कोटी ग्राहक खरेदी करतात. सरासरी प्रति व्यक्तीने ५५०० रुपये खरेदी केल्यास ३.५ लाख कोटी रुपयांचा व्यापार होऊ शकेल.
देशात दिवाळीला ५०० रुपये व त्यापेक्षा कमी रुपये खर्च करणारे लोक आहेत. तर हजारो व लाखो रुपये खर्च करणारेही अनेकजण आहेत. गिफ्ट, मिठाई, नमकीन, ड्रायफ्रूट, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, दागिने, क्रॉकरी, मोबाईल, फर्निचर, फुटवेअर, सौंदर्य प्रसाधन, किचनमधील साहित्य, संगणक उपकरण, स्टेशनरी, फळ, फुले, पूजा सामुग्री आदींची विक्री होते.
सेवा क्षेत्राला मोठी संधी
सेवा क्षेत्रात हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग, कॅब सर्व्हिस, इव्हेंट मॅनेजमेंट, कलाकार आदींचा व्यवसायही वाढेल. पंतप्रधानांनी स्थानिक वस्तूंवर भर देण्याचे आवाहन केल्याने चीनी उत्पादनांची मागणी कमी झाली आहे. या सणाच्या काळात चीनी उत्पादने विकली जाणार नाहीत. कारण व्यापाऱ्यांनी चीनी उत्पादनांची ऑर्डर केली नाही, असे खंडेलवाल म्हणाले.