राज्यात ३.५३ लाख कोटींची गुंतवणूक होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : दावोसमध्ये कंपन्यांशी सामंजस्य करार

केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला.
राज्यात ३.५३ लाख कोटींची गुंतवणूक होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : दावोसमध्ये कंपन्यांशी सामंजस्य करार

प्रतिनिधी/मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार करण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.

जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि राज्य तसेच केंद्र शासनाचे शिष्टमंडळ १५ जानेवारीला दावोस येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएई, ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर आर्सेलर मित्तल, जिंदाल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे एकंदरीतच दावोस दौरा यशस्वी झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ ते ८० टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले. या करारामुळे दोन लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खाण उद्योग अशा अनेक उद्योजकांनी डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात एक लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या समविचारी संबंधामुळे उद्योजक हे आत्मविश्वासाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचा अनुभव मिळाला. राज्यात पायाभूत सुविधा, दळणवळणाच्या उत्तम सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्टी, डॉयनॅमिक लिडरशीप, ग्लोबल लिडर म्हणून त्यांची ओळख झाली असल्याचे दावोस दौऱ्यात अनेक देशांतील लोकांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचे नाव जगभरात असून त्यांचे नाव लोक आदराने घेतात. परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाल्याचे शिंदे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in