
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ ११ जुलै रोजी सुनावणी करणार आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बी. आर. गवई व न्या. सूर्यकांत यांचे खंडपीठ सुनावणी करेल.
राज्यघटनेच्या कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २० हून अधिक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.
या सर्व याचिकांवर मार्च २०२० मध्ये सुनावणी होणार होती. त्यावेळी काही याचिकाकर्त्यांनी मागणी करूनही सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी याचिकाकर्त्यांनी सांगितले होते की, सुप्रीम कोर्टाने प्रेमनाथ कौल विरुद्ध जम्मू-काश्मीर राज्य व संपत प्रकाश विरुद्ध जम्मू-काश्मीर या खटल्यात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिले होते. हे निकाल ३७० च्या व्याख्येशी संबंधित होते. त्यात परस्परविरोधाभास होता, असा युक्तीवाद केला होता.
तेव्हा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा युक्तीवाद फेटाळून लावला होता.
यंदाच्या फेब्रुवारीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठासमोर तात्काळ सुनावणीचा उल्लेख झाला होता. तेव्हा सरन्यायाधीशांनी या याचिकांची नोंदणी करण्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते