नवी दिल्ली : मंगळवारी देशात ४७५ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून देशभरातील एकूण सक्रिय कोविड रुग्णांची संख्या आता ३९१९ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच सहा कोविड रुग्ण दगावले आहेत. दगावलेल्या रुग्णांत तीन कर्नाटक आणि दोन छत्तीसगड आणि एक आसाममधील रुग्णाचा समावेश आहे. ५ डिसेंबर २०२३ पर्यंत दैनिक रुग्ण नोंदींची संख्या दोन अंकी आकड्यापर्यंत घसरली होती. मात्र हिवाळा सुरू होताच नव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी ८४१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मे २०२१ मधील रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या अवघी ०.२ टक्के आहे. सध्याच्या एकूण कोविड रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्ण घरच्या घरीच उपचार घेत आहेत. जेएन-१ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ होत नसल्याचे तसेच या व्हेरियंटमुळे रुग्णांना रुग्णालयात जावे लागत नसल्याचे दिसून आले आहे.
भारताने कोविड-१९ साथीच्या तीन लाटा अनुभवल्या आहेत. यापैकी सर्वात मोठी लाट एप्रिल ते जून २०२१ दरम्यान होती. ही लाट शिगेला असताना देशभरात ४१४१८८ नवे रुग्ण नोंदले गेले होते. त्यात ३९१५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे ७ मे २०२१ रोजी घडले होते. २०२० सालाच्या सुरुवातीस या महामारीची सुरुवात झाली होती. तेव्हापासून एकूण ४.५ कोटी जणांना या साथीची लागण झाली होती, तर देशभरात एकूण ५.३ लाख जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ४.४ कोटी जण या साथीतून बरे झाले होते. भारतात कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८१ टक्के होते.