मणिपूरमध्ये चाैघांची हत्या

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे या घटनेचा निषेध केला असून या परिसरातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे
मणिपूरमध्ये चाैघांची हत्या
Published on

इम्फाळ : मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांकडून चाैघांची हत्या आणि पाच जणांना गंभीर जखमी करण्यात आल्यानंतर तेथे पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे संचारबंदी लागू झालेल्या एकूण जिल्ह्यांची संख्या आता पाच झाली आहे.

हल्लेखोर कॅमाफ्लॉज कपड्यात असल्यामुळे त्यांची ओळख होऊ शकली नाही. त्यांनी लपून स्थानिकांवर हल्ला चढवला. ही घटना लिलाँग चिंगजाव परिसरात घडली. गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अज्ञातांकडून झालेल्या या हल्ल्यानंतर स्थानिक चवताळले आणि त्यांनी रस्त्यावरील तीन चारचाकी वाहने पेटवून दिली.

या गाड्या कुणाच्या होत्या हे मात्र कळू शकले नाही. मात्र, प्रशासनाने या घटनेनंतर संचारबंदी लागू केली. यामुळे आता थौबुलख इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, काकचिंग आणि बिष्नूपूर या जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे या घटनेचा निषेध केला असून या परिसरातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, पोलीस या हल्लेखोरांना पकडण्याचे काम करीत आहेत. लवकरच त्यांना अटक होऊन कायद्यानुसार शिक्षा होर्इल. गेल्या ३ मेपासून मणिपूरमध्ये हिंसा उसळली असून आतापर्यंत एकूण १८० जणांचे प्राण गेले आहेत, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. बहुसंख्य मैतेर्इ आदिवासी समाजाने अधिसूचित जमातीत आरक्षण मिळण्याची मागणी लावून धरण्यासाठी काढलेल्या मोर्च्यावर हल्ला झाल्यानंतर या राज्यात दोन आदिवासी समाजात हिंसाचार सुरू झाला होता. त्याची झळ अजूनही या राज्याला लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in