शेतकऱ्यांच्या खात्यात अवघे 450 रुपये, तरी ईडीने पाठवली नोटीस; जाणून घ्या प्रकरण

नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होताच गदारोळ
शेतकऱ्यांच्या खात्यात अवघे 450 रुपये, तरी ईडीने पाठवली नोटीस; जाणून घ्या प्रकरण
PM

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना खात्यात अवघे 450 रुपये असताना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) नोटीस मिळाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गदारोळ उडाल्यावर ED ने हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

5 जुलै 2023 रोजी 72 वर्षीय शेतकरी आणि त्याच्या 67 वर्षीय भावाला ईडीने समन्स बजावले होते, परंतु आता हे प्रकरण बंद करण्यात आले आहे. या निर्णयाला राजकीय पक्षांसोबतच जनताही विरोध करत होती. कन्नयन आणि कृष्णन अशी या शेतकऱ्यांची नाव आहेत.

काय होतं प्रकरण?

कन्नयन आणि त्याचा भाऊ कृष्णन यांनी त्यांच्या शेताच्या भोवती अनधिकृत विद्युत कुंपण टाकलं होतं. त्यामुळे दोन जंगली प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांच्यावर 2017 मध्ये एफआयआर दाखल झाला होता. त्यानंतर 28 डिसेंबर 2021रोजी सत्र न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. तथापि, निर्दोष सुटल्यानंतरही ईडीने एफआयआरची दखल घेतली आणि या घटनेबाबत तामिळनाडू वन विभागाच्या पत्राच्या आधारे मार्च 2022 मध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला होता.

पण, गेल्या आठवड्यात ईडीने या शेतकऱ्यांना पाठवलेल्या जुन्या समन्सची नोटीस ( जुलै 2023 मधील) सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि गदारोळ झाला. तामिळनाडूतील राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी ED ने दोन्ही शेतकऱ्यांच्या जातीचा उल्लेख केलेल्या समन्स आणि ECIR (Enforcement Case Information Report) बाबत आक्षेप घेतला. दरम्यान, ईडीने जात ही टायपो (टायपिंग करताना झालेली चूक) असल्याचे सांगितले, तरी विरोध वाढतच गेला.

भाजप नेत्याच्या दबावामुळे कारवाई?

ईडीची कारवाई हा माझ्या अशीलांवर दबाव टाकण्याचा एक प्रयत्न होता. कारण त्यांची भाजपच्या जी गुणशेखर या स्थानिक नेत्यासोबत जमिनीवरून कायदेशीर लढाई सुरू आहे, असा दावा शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने केला आहे. त्यांनी ईडीच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करतानाच ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. "तामिळनाडू पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून अटक करावी, आम्ही यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे", अशी मागणीही वकिलांनी केली आहे.

दरम्यान, ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कृष्णन यांनी पोलिसांत धाव घेत पुन्हा गुणशेखर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. गुणशेखर यांनी 4 जानेवारीच्या सकाळी आपल्याला धमकावल्याचं कृष्णन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. कन्नयन आणि कृष्णन हे मागासवर्गीय असून गुणशेखर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळही केल्याचा कृष्णन यांनी आरोप केला आहे. गुणशेखर यांच्याविरोधात आपण 2020 सालापासून लढत असून त्याची माणसे आम्हाला आमच्याच शेतामध्ये जाण्यापासून गेली 3 वर्षे रोखत आहेत असे कृष्णन यांनी म्हटले आहे. कन्नयन यांना महिन्याला 1 हजार रुपये निवृत्तीवेतन आणि रेशनच्या दुकानातून मोफत तांदूळ मिळतो, त्यावरच आम्ही 3 वर्षे काढल्याचे कृष्णन यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in