नवी दिल्ली : वर्ष २०२५ मध्ये ४८ टक्क्यांची घसरण अनुभवल्यानंतर २०२६ मध्ये भारतातील ४जी स्मार्टफोन बाजार पुनरागमन करत आहे. काऊंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, ४जी स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये वर्षानुवर्षे ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपोनंट्सच्या वाढत्या किंमतींमुळे ४जी आणि ५जी उपकरणांमधील किमतीचा फरक वाढला आहे. ५जी स्मार्टफोन महाग झाले आहेत. परिणामी, एंट्री (१०,००० रुपयांपेक्षा कमी) आणि बजेट (१०,००० ते २०,००० रुपये) श्रेणीतील ग्राहक कमी किमतीत उत्तम स्पेसिफिकेशन्स मिळवण्यासाठी पुन्हा ४जी उपकरणांकडे वळत आहेत.
४-जी स्मार्टफोन वाढीची कारणे
स्मार्टफोनच्या सुट्या भागांच्या किमती वाढल्यामुळे ५जी फोन अधिक महागड्या श्रेणीत गेले आहेत.
ग्राहक जास्त पैसे खर्च न करता चांगल्या दर्जाचे स्पेसिफिकेशन्स आणि अनुभव शोधत असल्याने बजेट श्रेणीत ४जी ची मागणी वेगाने वाढत आहे.
५जी महाग झाल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपन्या बजेट श्रेणीत नवीन ४जी पोर्टफोलिओ आणत आहेत. २०२५ मध्ये या श्रेणीत ४जी मॉडेल देणाऱ्या कंपन्यांची संख्या २ होती. ती २०२६ मध्ये वाढून १२ झाली आहे.